Skip to main content

कांदा निर्यात शुल्क वाढीच्या मुद्यावरुन राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांनी आज शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केला आहे. शरद पवार यांचा गट रस्त्यावर उतरुन आंदोलन करत होता. त्याचवेळी सरकारमध्ये सहभागी असलेल्या गटाचे मंत्री धनंजय मुंडे दिल्लीला गेले होते. धनंजय मुंडे राज्याचे कृषीमंत्री आहेत. त्यांनी वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांना भेटून तोडगा काढण्याचा प्रयत्न केला. धनंजय मुंडे अजित पवारांसोबत सरकारमध्ये सहभागी झाले आहेत.

कांदा प्रश्नावरुन राज्यात राष्ट्रवादीचे दोन्ही गट सक्रीय झालेले असताना एक राजकीय घडामोड सुद्धा पाहायला मिळाली. राष्ट्रवादी काँग्रेसचा आतापर्यंत तटस्थ असलेला एक आमदार अजित पवार यांच्यासोबत जाऊ शकतो.

आंदोलनाला ‘या’ आमदाराची अनुपस्थिती

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली, त्यावेळी या आमदाराने तटस्थतेची भूमिका घेतली होती. आता मात्र हा आमदार हळूहळू अजित पवार गटाच्या दिशेने चालल्याच दिसत आहे. आज कांदा प्रश्नावरुन राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांनी जुन्नर आळेफाटा येथे आंदोलन केलं. या आंदोलनाला आमदार अतुल बेनके अनुपस्थित होते.

राष्ट्रवादीतील बंडानंतर हा आमदार काय म्हणाला होता?

“माझी भूमिका तटस्थ आहे. विकास कामासाठी मी ज्यांच्याकडे जावे लागेल. त्यांच्याकडे मी जाणार आहे” असं अतुल बेनके म्हणाले होते. “मी, ही परिस्थिती पाहता 2024 च्या निवडणूक लढविण्याच्या मानसिकतेत मी नाही. मी जाहीर करतो की, मी समाज कार्यात कार्यरत राहील” असं जुन्नरचे आमदार अतुल बेनके यांनी पत्रकार परिषद घेत जाहीर केलं होतं.

…म्हणून सुरु झाली चर्चा

आज तेच अतुल बेनके जून्नरचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार दिल्लीत होते. आज राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भेट घेतली. कांदा प्रश्नासाठी अतुल बेनके दिल्लीत गेले होते. धनंजय मुंडेंसोबत ते बैठकीला उपस्थित होते. त्यामुळे अतुल बेनके अजित पवार गटात जाणार अशी चर्चा सुरु झाली आहे.