Skip to main content

Kuno National Park Cheetah : आता पर्यटकांना मध्य प्रदेशातील (Madhya Pradesh) श्योपूर येथील कुनो नॅशनल पार्कमध्ये चित्ता पाहता येणार नाही. चित्त्यांच्या सततच्या मृत्यूनंतर त्यांना खुल्या जंगलातून पकडून आरोग्य तपासणीसाठी दुसरीकडे हलवण्यात येत आहे. गेल्या 4 महिन्यांत 8 चित्त्यांच्या मृत्यूनंतर सर्व चित्त्यांची आरोग्य तपासणी सुरू झाली आहे.

पर्यटक आता बघू शकणार नाही चित्ता
कुनो नॅशनल मॅनेजमेंटने पाच दिवसांत 6 चित्त्यांना खुल्या जंगलातून बंदोबस्तात आणलं आहे. त्यापैकी पवन, गौरव, शौर्य, आशा, धीरा, गामिनी या चित्त्यांना शांत करून घेरण्यात आलं. त्याचबरोबर या चित्तांच्या गळ्यातील रेडिओ कॉलरही काढण्यात आल्या आहेत. तज्ज्ञांच्या मते रेडिओ कॉलर हे चित्त्यांच्या मृत्यूचं कारण बनत होतं आणि त्यामुळे त्यांना जखमा होत होत्या.

11 जुलैला तेजस आणि 14 जुलैला सुरज या चित्त्यांचा मृत्यू झाल्यानंतर इतर चित्त्यांच्या आरोग्य चाचण्या करण्यात आल्या. यामध्ये आणखी तीन चित्त्यांच्या मानेमध्ये संसर्ग आढळून आला. रेडिओ कॉलरमुळे ही जखम झाली होती, ज्यामुळे या चित्तांचा मृत्यू झाला.

कॉलर आयडीमुळे ओढावलं संकट
चित्त्यांवर जो कॉलर आयडी लावण्यात आला होता, तो कॉलर आयडी वाघासाठी तयार करण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे. या कॉलर आयडींमुळे चित्ता अनफिट होते आणि या कॉलर आयडींमुळे चित्त्यांच्या मानेवर जखमा होऊन त्यात किडे लागण्यास सुरुवात झाली होती.

सुप्रीम कोर्टाने मागवला अहवाल
याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने केंद्राकडून सविस्तर अहवाल मागवला आहे. यावर आता पुढील सुनावणी 1 ऑगस्टला होणार आहे. चित्त्यांच्या मृत्यूबाबत सर्वोच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. उर्वरित चित्त्यांना राजस्थान किंवा अन्य ठिकाणी हलवण्याची मागणी याचिकाकर्त्याने केली आहे.

चित्त्यांच्या पुनर्वसनादरम्यान 50 टक्के मृत्यू सामान्य मानले जातात. आफ्रिकेतून 20 चित्ते आणले गेले होते आणि भारतात आल्यावर चार चित्त्यांचा जन्म झाला, त्यातील तीन जणांचा मृत्यू झाला आहे. 40 टक्के चित्त्यांच्या मृत्यूवर सर्वोच्च न्यायालयाने चिंता व्यक्त केली आहे.

पंतप्रधान मोदींकडून ‘प्रोजेक्ट चित्ता’ची सुरुवात
17 सप्टेंबर 2022 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भारतातून नामशेष झालेला चित्ता परत आणण्यासाठी चित्ता प्रकल्पाची सुरुवात केली होती. पण एकामागून एक चित्त्याचा मृत्यू होत आहे. नुकत्याच झालेल्या विधानसभेच्या अधिवेशनात वनमंत्री विजय शाह यांनी चित्ता प्रकल्पावर आतापर्यंत एकूण 32 कोटी रुपये खर्च झाल्याची माहिती दिली आहे.