Skip to main content

आता सगळ्यांना प्रतिक्षा आहे, ती चांद्रयान-3 च्या चंद्रावरील सॉफ्ट लँडिंगच्या क्षणाची. भारताच चांद्रयान-3 आता चंद्राच्या 25 किलोमीटर x 134 किलोमीटरच्या कक्षेत भ्रमण करत आहे. लँडिंग प्रोसेसच काऊंटडाऊन सुरु झालं असून आता 48 तासापेक्षा कमी वेळ उरला आहे. रशियाच लूना-25 हे स्पेसक्राफ्ट चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणार होतं. पण दुर्देवाने या यानाच क्रॅश लँडिंग झालं. त्यामुळे सगळ्या जगाच लक्ष आता भारताच्या चांद्रयान-3 मोहीमेकडे लागलं आहे. चांद्रयान-3 च यशस्वी लँडिंग झाल्यास भारत चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळ लँडिंग करणारा जगातील पहिला देश ठरणार आहे.

प्रत्यक्ष लँडिंगच्या दिवशी खासकरुन शेवटच्या 15 मिनिटात जास्त काळजी घ्यावी लागणार आहे. कारण हाच मिशनमधील सर्वात अवघड टप्पा असणार आहे. इस्रोने जाहीर केलय, 23 ऑगस्टला संध्याकाळी 6 वाजून 4 मिनिटांनी चांद्रयान-3 च सॉफ्ट लँडिंग होईल.

दोन स्पेस स्टेशन्सची मदत

चांद्रयान-3 मिशनची सुरुवात 14 जुलैला झाली होती. त्या दिवसापासून जगातील दोन अव्वल अवकाश संशोधन संस्था नासा आणि युरोपियन स्पेस एजन्सी (ESA) इस्रोला यानाच्या प्रकृतीवर लक्ष ठेवण्यासाठी मदत करत आहेत.

सुरुवातीपासून ESA ची मदत

“चांद्रयान-3 मिशन सुरु झाल्यापासून ESA आपल्या दोन ग्राऊंड स्टेशन्सच्या माध्यमातून इस्रोला मदत करत आहे. कक्षेतील यानाच्या हालचालींची माहिती बंगळुरुतील मिशन ऑपरेशन सेंटरला कळवली जात आहे. त्याचवेळी बंगळुरून येणाऱ्या कमांड म्हणजे आदेश यानापर्यंत पाठवले जात आहेत” अशी माहिती जर्मनी येथे कार्यरत असलेले ग्राऊड ऑपरेशन्स इंजिनिअर रमेश यांनी ‘द हिंदू’ला दिली.

कुठल्या दोन अँन्टेनाचा वापर?

युरोपियन स्पेस एजन्सीची फ्रेंच गुयाना येथील 15 मीटरची अँन्टेना आणि यूकेमधील गुनहिली अर्थ स्टेशनच्या 32 मीटर अँन्टेनाचा चांद्रयान-3 साठी वापर केला जात आहे.