Skip to main content

धावपळीची लाइफस्टाइल आणि खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी, पौष्टिक अन्नाचा अभाव यामुळे शरीर आतून पोकळ होऊन अनेक तऱ्हेचे गंभीर आजार होऊ शकतात. एवढंच नव्हे तर यामुळे आपल्या शरीरातील हाडंही (weak Bones) कमकुवत होतात. याच कारणामुळे आजकाल कमी वयातच काही लोकं हाडांशी संबधित समस्येमुळे त्रासलेले असतात.

खरंतर शरीरात पोषक तत्वांचा अभाव असेल तर हाडांशी संबंधित आजार होऊ लागतात. अशा परिस्थितीमध्ये आहारात काही पदार्थांचा (Healthy Bones Diet ) समावेश केला तर हाडांचे आरोग्य सुधारून ती स्ट्राँग किंवा मजबूत होतात. ते पदार्थ कोणते हे जाणून घेऊया.

नाचणी

100 ग्रॅम नाचणीमध्ये 345 मिलीग्राम कॅल्शियम असते. त्यामुळे आहारात नाचणीचा समावेश केल्यास शरीराला पुरेसे कॅल्शियम मिळते. त्यासाठी तुम्ही नाचणीच्या पिठाची भाकरी, डोसा किंवा लाडू करून खाऊ शकता.

बीन्स

हाडं पोकळ होऊ नयेत यासाठी प्रथिने, फायबर, कॅल्शियमने भरपूर अशा बीन्सचा आहारात नक्कीच समावेश केला पाहिजे. बीन्स हे सुपरफूडमध्ये गणले जाते आणि ज्यांच्या पायातून कट-कट असा आवाज येतो, त्यांनी तर बीन्स लगेचच खाणे सुरू करावे.

सोयाबीन

आपली हाडं मजबूत करण्यासाठी सोयाबीनचा आहारात समावेश करावा, याशिवाय तुम्ही टोफूचाही वापर करू शकता. 100 ग्रॅम टोफूमध्ये 350 मिलीग्राम कॅल्शियम असते. तुम्ही सॅलडमध्ये टोफूचा समावेश करू शकता.

ड्रायफ्रुट्स

हाडांचे आरोग्य सुधारण्यासाठी आहारात मूठभर सुक्या मेव्याचा समावेश केल्यासही नक्कीच फायदा होईल. त्यातही बदाम आणि अक्रोड खाणे आवश्यक आहे. बदाम भिजवून दुधासोबत खाल्ल्याने अधिक फायदे होतात. त्यामुळे हाडं मजबूत होतात.

दुग्धजन्य पदार्थ

तसेच आपण आहारात दुग्धजन्य पदार्थांचा अवश्य समावेश केला पाहिजे. रोजच्या रोज दूध पिणे, दही आणि पनीर यांचे सेवन करणे हे फायदेशीर ठरू शकते. त्यामुळे हाडं तर मजबूत होतातचं पण आपलं शरीरही निरोगी राहतं.

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)